| छत्रीधारी सैन्य |
| पान २ |
| पान ३ |
छत्रीधारी सैन्य : शत्रूच्या पिछाडीवर वा रणक्षेत्रावर हल्ला करण्यासाठी वायुवाहिनी ( एअर बोर्न ) सेनेचा उपयोग केला जातो. या सेनेची दोन अंगे आहेत : एक छत्रीधारी सैन्य व दुसरे विमानउतार सैन्य ( एअर लँडिंग ट्रुप्स). दुसऱ्या महायुद्धात ग्लायडर सैन्य हे तिसरे अंग अस्तित्वात होते ; परंतु ग्लायडर-सैन्याची हानी फार होत असल्याने ते आता व्यवहारात नाही.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : पहिल्या महायुद्धामध्ये ( १९१४—१८) टेहळणी, छायाचित्रण, बाँबहल्ले, मारामारी इत्यादींसाठी विमाने वापरण्यात आली; परंतु शत्रूच्या पिछाडीला उतरून शत्रूची फळी उलटविण्याची कारवाई झाली नाही. अमेरिकी जनरल मिचेल याने अशा कारवायांची योजना तयार केली होती; पण ती अमलात आली नाही. १९२७ मध्ये सर्वप्रथम इटलीत २५० छत्रीधारी सैनिकांचे एक पथक तयार करण्यात आले; परंतु त्यात पुढे काही प्रगती झाली नाही. रशियाने १९३० मध्ये मोठ्या संख्येने छत्रीधारी सैनिक व त्यांचे युद्धसाहित्य जमिनीवर उतरविण्याचे प्रदर्शन केले. १९३६ साली एका लष्करी हालचालीच्या सरावात एक संपूर्ण डिव्हिजन विमानातून उतरली. १९३९ मध्ये फिनलंडवरील चढाईत रशियाने छत्रीधारी सैन्य वापरले; परंतु रशियाने छत्रीधारी सेनातंत्रात लक्षणीय असे यश मिळविले नाही. फ्रान्समध्येही या सेनेबाबत फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत.
दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभीच, वायुवाहिनी सेनेच्या बाबतीत जर्मनी सर्वांच्या पुढे आहे, हे कळून चुकले होते. १९३९ मध्ये पोलंडवरच्या आक्रमणात छत्रीधारी सैन्य ⇨कमांडो म्हणून जर्मनीने वापरले. नॉर्वे व डेन्मार्कवरील चढाईतही याच दृष्टीने पंचमस्तंभीयांच्या साहाय्याने छत्रीधारी सैन्य वापरण्यात आले. १९४० मध्ये हॉलंडवरील चढाईत जर्मनसेनेच्या डावपेचात्मक हालचालींस आवश्यक असे तीन पूल छत्रीधारी सैन्याने काबीज केले. बेल्जियममधील इबन एमिल या किल्ल्याचा कबजा त्या किल्ल्यावरच उतरून जर्मन छत्रीधारी सेनेने घेतला. तसेच क्रीट बेट काबीज करण्याची जर्मनीची मोहीम ही सर्व दृष्टींनी लक्षणीय आहे. या मोहिमेत फक्त छत्रीधारी सैन्य, विमानउतार व ग्लायडरमधून नेलेले सैन्य यांनी कामगिरी केली. त्यात जर्मन सैन्याची फार हानी झाली. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी छत्रीधारी सैन्य वापरल्याची काही उदाहरणे आहेत. उदा., १९४४ मधील ओव्हरलॉर्ड मोहीम. यात नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील मोठ्या तोफांचे मोर्चे उद्ध्वस्त करणे व बगला पकडणे अशी कारवाई होती. १९४५ मध्ये ऱ्हाईन नदी पार करण्याच्या मोहीमेत व्हेझेल येथे १४,००० छत्रीधारी व ग्लायडर सैनिक उतरविले. याकरिता १,५७५ विमाने आणि सु.१,४०० ग्लायडर वापरले. ही मोहीम फारच सावधगिरीने झाली. छत्रीधारी सैनिकांना मदत मिळण्यात अडचण नव्हती. जर्मनीचा प्रतिकारही नव्हता. या कारवाईत काही लक्षणीय असे रणकौशल्य दिसत नाही. रशियाने १९४१-४२ मध्ये व्ह्याझमा-स्मोलेन्स्क रणक्षेत्रावर छत्रीधारी सैन्याच्या सहा ब्रिगेड वापरल्या.
विमानातून उडी घेत असलेला छत्रीधारी सैनिक
छत्रीधारी सैनिकाचे वैशिष्ट्य : इतर सैनिकापेक्षा छत्रीधारी सैनिक थोडा वेगळा असतो. कोठल्याही सेनेत त्यास मानाचे स्थान मिळते. विमानातून उडी मारून तो जमिनीवर उतरण्यापर्यंत त्याला स्वतःवर मानसिक ताबा ठेवावा लागतो. आकाशातून उतरताना त्याला एका वेगळ्या तऱ्हेचा एकाकीपणा वाटत असतो. जमिनीवर उतरल्यानंतर त्याला शत्रुप्रदेशात काही वेळ एकाकी काम करावे लागते. तो एकाकी पडल्यास त्याला येईल त्या प्रसंगास तोंड द्यावे लागते. त्याच्या ठायी शारीरिक व मानसिक बल, सहनशक्ती, निर्धारशक्ती व शस्त्रास्त्रे चालविण्याचे कौशल्य इतर सैनिकांपेक्षा उच्च प्रकारचे असावे लागते.
छत्रीधारी सैन्याची कामगिरी व संघटना : पुढील कामगिरीकरिता छत्रीधारी सैन्याचा वापर झाल्याचे गेल्या ४० वर्षांच्या इतिहासातून आढळून येते. (१) टेहळणी करणे, शत्रूला पिछाडीस त्रास देणे व किरकोळ लढाया करणे. (२) कमांडो कारवाया करणे. (३) अण्वस्त्रांच्या हल्ल्यानंतर ते क्षेत्र ताबडतोब ताब्यात घेणे किंवा शत्रुफळीत पडलेल्या भगदाडांतून युद्धक्षेत्र वाढविणे. (४) शत्रूची नियंत्रक संघटना आणि दळणवळण विस्कळीत करणे. (५) नवीन युद्ध-आघाडी सुरू करणे. (६) चिलखती व इतर दलांनी केलेल्या आघाताला पूरक कामगिरी करून शत्रूची त्वरेने दाणादाण करणे.
संघटना : छत्रीधारी सैन्याची संघटना ही प्रत्येक राष्ट्राची राजकीय व आर्थिक क्षमता आणि युद्धनिती यांवर अवलंबून असते. सध्या अणुयुद्धासाठी ही संरक्षण दले सिद्ध ठेवावी लागतात. एका डिव्हिजनमध्ये तीन छत्रीधारी ब्रिगेड म्हणजे नऊ पलटणी असतात. स्वयंचलित तोफखाना, रॉकेटप्रक्षेपण, विमानविरोधी तोफखाना, संदेशवाहक पलटण, प्रक्षेपणास्त्र पलटण व इतर साहाय्यक पलटणी असतात. आधुनिक डिव्हिजनमध्ये ७,००० ते ८,००० सैनिक असतात. तसेच रणांगणावर वापरावयाची अण्वस्त्रेदेखील असतात. त्यांत लहानमोठ्या उखळीतोफा, ⇨रणगाडाविरोधी प्रक्षेपणास्त्रे वगैरे शस्त्रास्त्रसंभार असतो. रशियाकडे वायुवाहिनी डिव्हीजनकरिता अन्टॉनॉव्ह—१२ व अन्टानॉव्ह—२२ विमाने आहेत. यांशिवाय ४० टन वजन घेऊन जाणारी ⇨ हेलिकॉप्टरही आहेत. अमेरिकेकडे एक वायुवाहिनी डिव्हिजन व एक वायुचलित (एअरमोबाइल) डिव्हिजन आहे. तसेच फेअरचाइल्ड ११९, सी—१३० लॉकहीड वगैरे मोठी विमानेही आहेत.
