| तंतु, नैसर्गिक |
| पान २ |
| पान ३ |
| पान ४ |
| पान ५ |
| पान ६ |
तंतु, नैसर्गिक : व्यासाच्या किंवा रुंदीच्या सु. २०० पट लांब असलेल्या केसासारख्या घन वस्तूला (द्रव्याला) तंतू असे म्हणतात. निसर्गात आढळणाऱ्या अशा तंतूंना नैसर्गिक तंतू असे म्हणतात. नैसर्गिक तंतू तीन प्रकारचे आहेत : वनस्पतिजन्य, प्राणिजन्य व खनिज. सामान्यपणे काही तंतूंचाच व्यापारी उपयोग करण्यात येतो. वनस्पतिजन्य तंतू हे बीजाभोवती केसासारख्या स्वरूपात आणि खोड वा पाने यांत कोशिकांच्या (संरचनात्मक घटकांच्या) अथवा धाग्यांच्या स्वरूपात आढळतात. रासायनिक दृष्टया हे तंतू सेल्युलोजाचे असतात. पण काही वेळा त्यांत लिग्निने, पेक्टिने व मेणे ही नैसर्गिक स्वरूपांत कमीजास्त प्रमाणात मिसळलेली असतात. रेशीम वगळता इतर प्राणिजन्य तंतू केराटीनयुक्त असतात [⟶ केराटिने]. ॲसस्बेस्टस हा नैसर्गिक रीत्या आढळणारा व औद्योगिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला एकमेव खनिज तंतू होय. अलीकडच्या काळातील कृत्रिम तंतूंच्या शोधामुळे नैसर्गिक तंतूंचे कापडनिर्मिती व औद्योगिक वापर यांतील प्रमाण कमी झाले. १९५०–७० या काळात सर्व प्रकारच्या तंतूंचे जागतिक उत्पादन १,६०० कोटी किग्रॅ. वरून २,५०० कोटी किग्रॅ, एवढे वाढले. एकूण वाढीपैकी १/३ वाढ नैसर्गिक तंतूंच्या व २/३ वाढ कृत्रिम तंतूंच्या उत्पादनात झाली. १९६८–६९ साली सु. ३०% कृत्रिम तंतू आणि सु. ७०% नैसर्गिक तंतू तयार झाले. नैसर्गिक तंतूंमध्ये कापसाची टक्केवारी जास्त म्हणजे सु. ४६.२% इतकी, तर सर्वांत कमी टक्केवारी रेशमाची (०.१५%) आहे.
इतिहास : सर्वांत पहिला तंतू मानवाच्या वापरात आला तो फ्लॅक्सचा (अळशीचा) होय. तो इ. स. पू. ५००० वर्षांपासून वापरात आहे. इ. स. पू. ४००० नंतर नवाश्म युगातील मानवाने लोकरीचा उपयोग केला. हे दोन्ही तंतू स्वित्झर्लंडमधील तलावांजवळ राहणाऱ्या लोकांनी प्रथम वापरले. इ. स. पू. ३००० पासून भारतात कापसाचा उपयोग करण्यात आला आणि इ. स. पू. २६४० पासून चीनमध्ये रेशीम वापरात आले. ताग (ज्यूट) रॅमी, युरेना (जंगली कापूस, वनभेंडी), हेंप इत्यादींचा उपयोग प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. पण त्यांच्या वापराबद्दलचे नक्की उल्लेख आढळत नाहीत. तथापि अथर्वसंहितेत तागाचा उल्लेख आलेला आहे. हेंप या तंतुमय वनस्पतीची सर्वप्रथम लागवड चीनमध्ये इ. स. पू. ४५०० मध्ये करण्यात आली. कापूस, फ्लॅक्स, रेशीम, ताग इत्यादींच्या ऐतिहासिक माहितीकरिता त्या विषयांवरील स्वतंत्र नोंदी पहाव्यात.
वनस्पतिजन्य तंतू : तंतू निर्मिणाऱ्या वनस्पतींच्या पानांत, खोडांत वा फळांत लांब, धाग्यासारख्या, बारीक व जाड भित्ती असलेल्या कोशिका वा ऊतके (कोशिकासमूह) असतात. दोन हजारांहून जास्त वनस्पतींच्या जातींपासून तंतू मिळतात, पण त्यांपैकी पन्नासहून कमी जातीच व्यापारी दृष्टया महत्त्वाच्या आहेत. या तंतूंचा उपयोग (१) कापड, (२) दोर, (३) ब्रश व कुचले, (४) भरण पदार्थ, (५) कागद (६) फेल्ट (नमदा) तंतू आणि (७) सेल्युलोज व इतर रासायनिक पदार्थ यांच्या निर्मितीत कच्चा माल म्हणून मुख्यत्वे करतात. बऱ्याच तंतुयुक्त वनस्पतींपासून तंतूंच्या इतकेच वा त्याहून जास्त महत्वाचे पदार्थ मिळतात. उदा., सरकीपासून तेल व पेंड; नारळापासून खोबरे व खेबरेल तेल; लिलिएसी कुलातील युका व लेचुगिला (घायपाताची एक जात) ह्या वनस्पतींपासून औषधे व इतर पदार्थ तयार करण्यास लागणारे सॅपोनिनासारखे महत्त्वाचे उपपदार्थ मिळतात.
फळे व बीजे यांच्यापासून मिळणारे तंतू : जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा आणि विविध प्रकारे उपयोगात आणला जाणारा या प्रकारातला महत्त्वाचा तंतू म्हणजे कापूस होय. कापसाच्या झाडाला फुले येऊन त्यांपासून बनलेल्या बोंडांत कापूस तयार होतो. कापसाचा तंतू एककोशिक (एका कोशिकेचा बनलेला) व लांबट असून बीजाच्या (सरकीच्या) बाहेरच्या स्तरापासून निघतो. कापसाच्या प्रकारानुसार ह्या तंतूंची लांबी सु.१०–६२ मिमी. असून त्यांचा व्यास १२–२५ मायक्रॉन (१ मायक्रॉन = ०.००१ मिमी.) असतो. एका सरकीपासून सु. १०,००० तंतू निघतात. बोंड पिकल्यावर तडकते त्या वेळी तंतु-कोशिका मृत असून त्यांतील बाष्प कमी होते व प्रत्येक तंतूला विशिष्ट आकार येतो. सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यास हा आकार पीळ दिलेल्या फितीसारखा दिसतो. व्यापारीदृष्टया कापसाचे महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) सी आयलंड (द. कॅरोलायना, जॉर्जिया व फ्लॉरिडा यांच्या किनाऱ्याजवळील अटलांटिक महासागरातील बेटांवरून नाव मिळालेल्या) कापसाचे तंतू कमी व्यासाचे, लांब, बळकट व चकचकीत असतात; (२) ईजिप्शियन कापूस वरीलप्रमाणेच असतो; (३) अमेरिकन व ईजिप्शियन यांचा संकरज प्रकार; (४) अमेरिकन कापसाचे तंतू वरील तीन्हीपेक्षा कमी बळकट, लहान व अनियमित आकाराचे असतात व (५) आशियाई कापूस भरड, तुटणारा व कमी लांबीचा असतो [⟶ कापूस].
