| तंबाखू |
| पान २ |
| पान ३ |
| पान ४ |
| पान ५ |
| पान ६ |
| पान ७ |
| पान ८ |
| पान ९ |
| पान १० |
| पान ११ |
तंबाखू : (तंबाकू; हिं., गु., बं. तमाकू; क. होगेसोप्पू; इं. टोबॅको; लॅ. निकोटियाना टाबॅकम व नि. रस्टिका; कुल-सोलॅनेसी). फार पुरातन काळापासून मनुष्याने निरनिराळ्या वनस्पतींच्या पानांचा उपयोग खाण्यासाठी (चघळण्यासाठी), तपकिरीसाठी, धूम्रपानासाठी वा औषधासाठी केला आहे; त्यांपैकी तंबाखूसारखा दुसऱ्या कोणत्याही वनस्पतीचा जगभर प्रसार झालेला नाही. किंबहुना तंबाखूएवढी लोकप्रियता दुसऱ्या कोणत्याही वनस्पतीला लाभली नाही. तंबाखूच्या मूलस्थानाविषयी व इतिहासाविषयी जी माहिती उपलब्ध आहे ती काहीशी अपुरी व परस्परविरोधी आहे. कोलंबस आणि त्यांच्या खलाश्यांनी १४९२ च्या सुमारास वेस्ट इंडीज बेटांत स्थानिक लोकांना तंबाखूचा वापर करताना पाहिले. त्या अगोदर कित्येक वर्षे अमेरिकेतील रेड इंडियन लोक तिचा औषधासाठी व समारंभांत उपयोग करीत असावेत, असे काही लोकांचे मत आहे. काहींच्या मते बाराव्या शतकात आशियात तंबाखूची वनस्पती अस्तित्वात होती आणि काही जमातींमध्ये ती पवित्र मानली जात असे. भारतातील पौराणिक कथांतील तंबाखूसंबंधी पुष्कळशा उल्लेखांवरून व आयुर्वेदीय पद्धतीने तयार करावयाच्या काही औषधांच्या कृतींवरून या देशात ही वनस्पती फार प्राचीन काळापासून माहीत होती असे दिसते. अलीकडील काळात पोर्तुगीज लोकांनी सतराव्या शतकात ही वनस्पती भारतात आणली आणि तेव्हापासून तिची व्यापक प्रमाणावर लागवड झाली, असे अधिकृतपणे मानले जाते. सुरुवातीच्या काळात तंबाखूच्या वापराला सामाजिक प्रतिष्ठा नसल्यामुळे या वनस्पतीच्या लागवडीकडे दुर्लक्ष झाले, तरीसुद्धा ती तग धरून राहिली. आज भारतात एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या सु. ०·३% एवढ्याच क्षेत्रावर तंबाखूचे पीक पिकविले जात असले, तरी हे महत्त्वाचे पीक आहे. दर वर्षी तंबाखूचे सु. साडेतीन ते चार लक्ष टन उत्पन्न होते. सु. ६६ अब्ज सिगारेट व २,५०,००० अब्ज विड्या दर वर्षी तयार केल्या जातात आणि सु. ४२ लक्ष लोक तंबाखूची लागवड व प्रक्रियांच्या आणि इतर संबंधित कारखान्यांत गुंतले आहेत. तंबाखूपासून भारत सरकारला दर वर्षी अंदाजे २२८ कोटी रुपये अबकारी कराच्या रूपाने मिळतात व निर्यातीमुळे १९७२ साली ५७ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले.
आ. १. देशी तंबाखूचे झाड : नि. टाबॅकम : (१) पान व फुलोरा, (२) फुलाचा उभा छेद, (३) फळाचा उभा छेद, (४) फळ, (५) बी.
वनस्पतिवर्णन : ही परिचित वस्तू ज्या वनस्पतीपासून मिळवितात ती आणि तिच्यासारख्या (तिच्या वंशातील) इतर जाती मूळच्या उ. आणि द. अमेरिकेतील असून काही ऑस्ट्रेलियातील आहेत. त्या सर्व निकोटियाना या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलझाडांच्या वंशातील व धोत्रा कुलातील [⟶ सोलॅनेसी] असून निकोटियाना टाबॅकम (देशी) आणि नि. रस्टिका (विलायती किंवा कलकत्तिया) या जाती तंबाखूकरिता लागवडीत आहेत. ह्या दोन्ही जाती रानटी अवस्थेत आढळत नाहीत. इतर काही जाती बागेत शोभेकरिता लावतात (भारतात नि.ॲलाटा व नि. प्लंबॅजिनिफोलिया). निकोटियाना हे नाव झां नीको (१५३०–१६००) ह्या फ्रान्सच्या लिस्बन (पोर्तुगाल) येथील राजदूतांच्या नावारून दिले आहे, कारण त्यांनी बेल्जियममधील (फ्लँडर्स) एका व्यापाऱ्याकडून तंबाखू घेऊन ती प्रथम पोर्तुगालच्या राजदरबारी सादर केली व नंतर फ्रान्सला परत आल्यावर राणीला (कात्रिअन द मेदेसेस) भेट म्हणून दिली (१५६०). कोलंबस यांच्या पूर्व काळात वेस्ट इंडीज, मेक्सिको, म. अमेरिका व द. अमेरिकेचा उत्तर भाग येथे तंबाखू लागवडीत होती. कोलंबस यांचे खलाशी प्रथम (१४९२) वेस्ट इंडीजमध्ये उतरले त्या वेळी त्यांनी तेथील कॅरीब इंडियन लोकांना तंबाखूच्या पानांचे सिगार ओढताना आणि तंबाखूची पाने विस्तवावर टाकून नाकाने वाय (Y) या इंग्रजी अक्षराच्या आकाराच्या नळीच्या साहाय्याने धूर ओढताना पाहिले. त्या नळीला किंवा सिगाराला ‘टोबॅकोस’ हे नाव होते व पुढे तेच नाव तंबाखूला दिले गेले. स्पॅनिश भाषेत टोबॅको, इंग्रजीत टोबॅको व मराठीत तंबाखू ही रूपे मूळच्या टोबॅकोसवरून आली असावीत हे उघड आहे; लॅटिन नावातील टाबॅकम हा शब्द तसाच आला आहे. निकोटियाना वंशात एकूण साठ जाती असून त्यांची विभागणी तीन उपवंशांत (टाबॅकम, रस्टिका आणि पिटुनिऑइडीस) केली जाते. नि. टाबॅकम या जातीचा अंतर्भाव टाबॅकम उपवंशात व नि. रस्टिका या जातीचा रस्टिका उपवंशात करतात.
निकोटियाना टाबॅकम : तंबाखूची ही जाती विशेषेकरून उष्ण प्रदेशांत तंबाखूकरिता लागवडीत आहे; ती सध्या जंगली अवस्थेत आढळत नाही. नि. सिल्व्हेस्ट्रिस व नि. ऑटोफोरा यांच्या संकरापासून पूर्वी तिचा उगम झाला असावा, तसेच संकरानंतर तिच्या शरीरातील रंगसूत्रेही (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटकही) द्विगुणित (रंगसूत्रांची संख्या नेहमीच्या दुप्पट होणे) झाली असावीत [⟶ बहुगुणन]. वायव्य अर्जेंटिना व जवळचा बोलिव्हिया हे क्षेत्र तिचे मूळचे प्रसारस्थान असावे कारण तेथेच तिचे हे पितर होते आणि आजही आहेत. तिचे अनेक (सु. ६९) प्रकार व संकरज आज उपलब्ध आहेत; त्यांची दोन गटांत विभागणी केली असून त्यांमध्ये त्यांचा फुलोरा, पानांचे देठ आणि त्यांचा आकार व वनस्पतींचे स्वरूप विचारात घेतले जाते. ही वनस्पती मजबूत, वर्षायू (एक वर्ष जगणारी), एक ते तीन मी. उंच असून तिच्या सरळ खोडावर थोड्या फांद्या व सर्वत्र प्रपिंडयुक्त (चिकट ग्रंथियुक्त) केस असतात. पाने लांबट, अंडाकृती किंवा कुंतसम (भाल्यासारखी) व सु. १०० सेंमी. लांब असतात; देठ कधीकधी आढळतो व पात्याला तळाशी कानाच्या पाळीसारखा विस्तार असतो. परिमंजिरी फुलोरा [⟶ पुष्पबंध]; फुले द्विलिंगी, नियमित, पंचभागी, नसराळ्यासारखी, फिकट लाल किंवा पांढरी; किंजदले दोन [⟶ फूल]; फळ (बोंड) शुष्क, लंबगोल किंवा गोलसर सु. १५–२० मिमी. लांब; बी गोलसर अथवा लांबट गोलसर, ०·५ मिमी. लांब, पिंगट (तपकिरी) असून त्यावर उभे पंखयुक्त कंगोरे असतात. या बियांची अंकुरणक्षमता २० वर्षांपर्यंत टिकते असे म्हणतात; परंतु भारतात ती सर्वसाधारणपणे ३ वर्षांपेक्षा जास्त नसल्याचे आढळून आले आहे. इतर सामान्य शारीरिक लक्षणे धोत्रा कुलात [⟶ सोलॅनेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. नि. रस्टिका या जातीपेक्षा ही जात अधिक कणखर व सोशिक असल्याने अमेरिकेतही विशेषेकरून लागवडीत आहे.
