| तत्त्वज्ञान |
| पान २ |
| पान ३ |
| पान ४ |
तत्त्वज्ञान : तत्त्वज्ञानाचे एकंदर स्वरूप आणि व्याप्ती काय आहे, त्याच्यात कोणते प्रश्न मोडतात, ह्या ज्ञानशाखेचा इतर ज्ञानशाखांशी कोणता संबंध आहे (किंवा कोणकोणते संबंध आहेत), तत्त्वज्ञानात वापरल्या जाणाऱ्या रीतीचे ज्ञानाच्या इतर क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या रीतींशी कोणत्या बाबतीत साम्य आहे आणि कोणत्या बाबतीत त्यांच्यात भिन्नता आहे ह्या गोष्टींचे सामान्यपणे दिग्दर्शन करणे, हा ह्या लेखाचा उद्देश आहे.
सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. तत्त्वज्ञानाचे स्वरूप काय, त्याचा इतर मानवी ज्ञानाशी काय संबंध आहे इ. प्रश्न तत्त्वज्ञानातच उपस्थित केले जातात. इतर ज्ञानशाखांचे तसे नसते. गणिताचे नेमके स्वरूप काय आहे, त्याचा इतर ज्ञानशाखांशी कोणता संबंध आहे, हे प्रश्न गणित स्वत:संबंधी उपस्थित करीत नाही, तर तत्त्वज्ञान हे प्रश्न गणिताविषयी आणि इतर सर्व ज्ञानशाखांविषयी उपस्थित करते आणि तत्त्वज्ञान इतर ज्ञानशाखांविषयी जसे हे प्रश्न उपस्थित करते तसेच स्वत:संबंधीही ते उपस्थित करते. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तत्त्ववेत्त्याने एक विशिष्ट तात्त्विक भूमिका स्वीकारलेली असते. तत्त्वज्ञानाचा नेमका विषय, त्याची व्याप्ती, रीत ह्याविषयीच्या प्रश्नांना तत्त्ववेत्ते वेगवेगळ्या भूमिकांतून परस्परविरोधी उत्तरे देतात. म्हणजे प्रत्येक तात्त्विक दर्शनात तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाविषयी एक विशिष्ट कल्पना स्वीकारलेली असते आणि तिचे प्रामाण्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही कल्पना त्या तात्त्विक दर्शनाचा एक भाग असते आणि वेगवेगळ्या दर्शनात ती भिन्न असते. आपल्याला तटस्थ दृष्टिकोनातून तत्त्वज्ञानाचे स्वरूप आणि रीत यासंबंधी कोणत्या भिन्न कल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत किंवा स्वीकारल्या जाण्यासारख्या आहेत, हे पहायचे आहे.
‘तत्त्वज्ञानाचे कार्य काय?’ ह्या प्रश्नाचे एक सरळ उत्तर आपण देऊ शकत नाही. तत्त्वज्ञानाची अनेक भिन्न कार्ये आहेत पण ती परस्परसंबंद्ध आहेत. त्यांची एकमेकांपासून आपण फारकत करू शकत नाही. मानव स्वत:च्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी आहे. ह्या त्याच्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान. आपल्या अनुभवांची एका अत्यंत व्यापक चौकटीत बौद्धिक संगती लावण्याच्या आणि अशा चौकटीच्या संदर्भात स्वत:च्या जीवनाला वळण आणि दिशा देण्याच्या त्याच्या प्रेरणेतून तत्त्वज्ञान उदयाला येते आणि विकास पावते. जेव्हा एखादे विशिष्ट विज्ञान, मानवी व्यवहाराचे एखादे विशिष्ट क्षेत्र (उदा., गणित, भौतिकी, राजकारण, धर्म) स्वत:विषयी, स्वत:चे स्वरूप, उद्दिष्टे, रीत, ज्ञानाच्या व जीवनाच्या अन्य क्षेत्रांशी असलेले आपले संबंध ह्यांविषयी प्रश्न उपस्थित करते किंवा त्याच्या संबंधात असे प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा त्या विषयाचे तत्त्वज्ञान निर्माण होते.
तत्त्वज्ञानाचे एक प्रमुख कार्य म्हणजे विश्वाचे समग्र, साकल्याने प्रतीत होणारे स्वरूप काय आहे तसेच मानव हा काय आहे आणि मानवाचे विश्वातील स्थान कोणते हे निश्चित करणे आणि त्या आधारावर मानवाला योग्य असा जीवनमार्ग कोणता ह्याचा शोध घेणे. आज विश्वाच्या वेगवेगळ्या विभागांचा वा अंगांचा अभ्यास करणारी अनेक स्वतंत्र विज्ञाने आहेत. उदा., भौतिकी, रसायनशास्त्र, जीवविज्ञान इ. आणि त्यांनी विश्वाची सर्व अंगे वाटून घेतलेली आहेत. पण जगात भारत, ग्रीक, रोम. इ. प्राचीन संस्कृती प्रौढावस्थेत आल्या तेव्हा, म्हणजे विद्या किंवा ज्ञान हे स्वतंत्र मूल्य म्हणून आदरणीय झाले तेव्हा, मानवी ज्ञानाच्या सुरुवातीला अशी स्थिती नव्हती. तेव्हा विश्वाचा सबंध विस्तार माणसासमोर पसरलेला होता आणि ‘विश्वाचे एकंदर स्वरूप काय?’ अशा सामान्य स्वरूपाचा प्रश्नच जिज्ञासूंना विचारता येण्याजोगा होता. उदा., ‘हे विश्व कशाचे बनलेले आहे?’ हा प्रश्न ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी व भारतीयांनीही विचारला आणि त्याची वेगवेगळी उत्तरे दिली. उदा., ‘विश्व पाण्याचे बनलेले आहे’, ‘परमाणूंचे बनलेले आहे’, ‘त्रिगुणात्मक आहे’. मानवी ज्ञानाचा विस्तार हळूहळू जसा वाढला, ज्ञान अधिकाधिक सूक्ष्म आणि विविध झाले तेव्हा विश्वाच्या वेगवेगळ्या विभागांचा, आपापल्या विषयाच्या स्वरूपाला अनुरूप अशा रीतींचा अवलंब करून अभ्यास करणारी स्वतंत्र, पृथक् विज्ञाने तत्त्वज्ञानापासून उदयाला आली. तत्त्वज्ञान सर्व विज्ञानांची जननी होय.
पण अजूनही ‘विश्वाचे समग्र स्वरूप काय आहे?’ हा तत्त्वज्ञानाने सुरुवातीला विचारलेला प्रश्न उरतोच आणि त्याचे उत्तर कोणत्याही विशिष्ट विज्ञानाला देता येत नाही. त्याचे उत्तर तत्त्वज्ञानाला द्यावे लागते किंवा हा प्रश्न विचारण्यात काही स्वारस्य आहे की नाही, ह्याचा विचार करावा लागतो. ह्या प्रश्नाचा एक अर्थ असा: ‘वेगवेगळी विज्ञाने वेगवेगळ्या वस्तुप्रकारांचा अभ्यास करतात, पण ह्यांतील मूलभूत वस्तुप्रकार कोणता?’ ह्याचे एक शक्य उत्तर असे, की जड किंवा भौतिक वस्तू हा
वस्तूचा मूलभूत, स्वायत्त प्रकार आहे; जीवन, चैतन्य किंवा मन म्हणजे स्वतंत्र स्वायत्त वस्तू नव्हेत, तर जड वस्तूंच्या ठिकाणी काही विशिष्ट परिस्थितीत आविर्भूत किंवा निष्पन्न होणारे धर्म आहेत. अस्तित्व हे केवळ जडस्वरूप आहे आणि सर्व वस्तुप्रकार हे जडवस्तूचे केवळ उपप्रकार आहेत. हे मत म्हणजे ⇨ जडवाद. उलट चित्तत्त्व हेच मूलभूत, स्वतंत्र, स्वयंभू असे तत्त्व आहे किंवा जडवस्तू वा सजीव वस्तू ह्यांचे अस्तित्व दुय्यम असते, चित्तत्त्वावर अवलंबून असलेले असे असते. हे प्रकार म्हणजे चित्तत्त्वाचे आविष्कार आहेत. हे मत म्हणजे ⇨ चिद्वाद्. तिसरा पर्याय असा, की जडतत्त्व आणि चित्तत्त्व हे दोन भिन्न पण सारखेच, स्वतंत्र आणि स्वयंभू असे अस्तित्व प्रकार आहेत किंवा हे दोन्ही उपप्रकार असून मूलवस्तूचे आंतरिक स्वरूप ह्या दोहोंहून भिन्न असते व त्यापासून हे उपप्रकार निष्पन्न होतात. ह्या संदर्भात उपस्थित होणारा आणखी एक प्रश्न असा, की हे अस्तित्व म्हणजे एकाच तत्त्वाचा आविष्कार आहे, की अनेक भिन्न वस्तूंचा समुदाय आहे? [→ एकसत्तावाद].
