| तयार कपडे |
| पान २ |
| पान ३ |
| पान ४ |
तयार कपडे : आपल्या आवडीचे, अंगाला नीट बसणारे, सरळ दुकानात जाऊन खरेदी करावयाचे पँट, शर्ट, कोट यांसारखे कपडे. कापडाच्या दुकानात कापड खरेदी करून त्यातून शिंप्याने आपली मापे घेऊन त्यांनुसार शिवलेल्या कपड्यांपासून भिन्नत्व दर्शविण्यासाठी ही संज्ञा वापरात आहे. अंदाजे १९३० पासून तयार कपडे जरी हिंदुस्थानात मोठ्या शहरांत तुरळक उपलब्ध होत असले, तरी त्यांची आवड व उपलब्धता यांत सु. १९६० पासूनच मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. कापड चांगले दिसणे निराळे व शिवलेला कपडा अंगात चांगला दिसणे निराळे. तयार कपडा घेण्यात आपली अंतिम पसंती वापरता येते, हा या प्रकारच्या कपड्यांतील फायदा होय. शिवाय वाट न पाहता वस्तू लगेच मिळते, हाही आणखी एक फायदा आहेच. तयार कपड्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्यामुळे तसेच सामान्यतः वाया जाण्याची शक्यता असलेल्या कापडाचाही या निर्मितीत योग्य उपयोग करण्यात येत असल्यामुळे त्याच कापडाच्या शिवून घेतलेल्या कपड्यापेक्षा तयार कपडा कधीच महाग पडत नाही, असलाच तर स्वस्तच असतो. या गोष्टींमुळेच आता तयार कपडे घेण्याकडे अधिकाधिक लोक प्रवृत्त होत आहेत.
इतिहास : पुराश्मयुगात यूरोप खंडाच्या उत्तर भागात तेथील लोक कडक थंडीमुळे कातड्याचे शिवलेले कपडे वापरीत असत. कशाने तरी कातड्याला भोके पाडून त्या भोकांतून मग कातड्याची वादी ओवून घेत असत, असे आढळले आहे. दक्षिण यूरोपात त्याच काळातील हाडाच्या बारीक सुया आढळल्या आहेत; त्या वनस्पतीचे तंतू किंवा दोरा घेऊन शिवण्यासाठी वापरावयाच्या असाव्यात. नंतरच्या पण पुरातन संस्कृतीत जरी विणाई व भरतकाम या कलांचा विकास झाला होता आणि पुढे कताई व विणाई यांत यांत्रिकीकरण आले, तरी शिवण्याच्या साधनांत सुधारणा झाली नाही.
शिवणाचे यांत्रिकीकरण : शिवणयंत्र शोधून काढण्याच्या प्रयत्नास आठराव्या शतकात सुरुवात झाली. बार्तेल्मी तीमॉन्ये या फ्रेंच यंत्रज्ञांनी आपल्या शोधाचा उपयोग करून यंत्राच्या साहाय्याने लष्करासाठी कपडे बनविण्यास आरंभ केला; पण या यंत्रामुंळे बेकारी येईल या भीतीने शिंपी लोकांनी त्याविरुद्ध मोठी निदर्शने केली. तीमॉन्ये यांचा हा प्रयोग अयशस्वी झाला. याच्या पुढचा टप्पा म्हणजे इलाअस हौ या अमेरिकी यंत्रज्ञांचा अडक टाक्याच्या यंत्राचा शोध हा होय. त्यांच्या यंत्रात सुई, दोन दोरे आणि एक धोटा या गोष्टी वापरल्या होत्या. हौ यांनी या यंत्राचे एकस्व (पेटंट) घेतले; पण त्याचा प्रसार होऊ शकला नाही. शेवटी अमेरिकी शिंप्यांच्या पसंतीस उतरणारे शिवणयंत्र आयझाक सिंगर यांनी १८५१ मध्ये तयार केले. पुढील काही वर्षात शिंप्याला उपयोगी पडणाऱ्या साधनांत वरील शिवणयंत्राशिवाय कसलीही भर पडली नाही. त्यामुळे दुसरा माणूस कपडा बेतून देईपर्यंत यंत्र चालविणाऱ्याला थांबून रहावे लागे. पण लीड्स (इंग्लंड) येथील जॉन बारन या कल्पक गृहस्थांनी पट्टी कर्तन यंत्र बनवून ही अडचण १८६० मध्ये दूर केली. त्यांनी लाकूड कापण्याच्या पट्टी करवत यंत्रातील करवतीच्या पट्टीचे दाते घासून तेथे धार ठेवली आणि मग या यंत्राच्या साहाय्याने कापडाची थप्पीच कापणे शक्य होऊ लागले. सिंगर व बारन यांच्या शोधांमुळे कपडा कापणे व शिवणे या शिवणकामातील दोन मूलभूत क्रियांचे यांत्रिकीकरण पूर्ण झाले. अमेरिकेच्या रिसी मशिनरी कंपनीने अठराव्या शतकाच्या शेवटी काज करण्याचे यंत्र शोधून काढले. पुढे त्यामध्ये सुधारणा करून सिंगर कंपनीने काजे करण्याची तसेच गुंड्या शिवण्याची यंत्रेही तयार केली. होफमान इस्त्री यंत्राच्या शोधामुळे तयार कपड्यांना जलद इस्त्री करता येणे शक्य झाले. तथापि विशिष्ट प्रकारच्या उच्च दर्जाच्या कपड्यांसाठी अद्यापिही हात इस्त्रीची पद्धत वापरली जाते. या सर्व शोधांमुळे तयार कपडे जलद, अधिकाधिक चांगल्या दर्जाचे आणि विविध प्रकारच्या कापडांचे तयार करता येणे शक्य होऊ लागले.
पुरुषांचे कपडे : कपडे शिवून तयार करण्याच्या धंद्याच्या दृष्टीने विचार करता असे आढळते की, यूरोपातील देशांत आणि त्यानुसार अमेरिकेतही पुरुषांचे कपडे शिवण्यासाठी शिंपी असत. ते मापे घेऊन त्यांनुसार कपडे शिवून देत. बायकांचे कपडे बायका घरीच शिवीत असत. या पद्धती जवळजवळ सन १८०० पर्यंत चालू होत्या व पुढे अगदी हळूहळू त्या प्रचारातून कमी होऊ लागल्या. पुरुषांचे व काही प्रमाणात स्त्रियांचेही कपडे तयार कपड्यांपेक्षा बरेच जास्त महाग पडत असले, तरी ते शिंप्याकडून शिवून घेणे अजूनही चालू आहे. अर्थात ही गोष्ट फक्त समाजाच्या वरच्या थरातील लोकांनाच परवडते.
तयार कपडे विकण्याच्या पद्धतीस अमेरिकेत प्रथम सुरुवात झाली, असे दिसते. जहाजांवरील खलाशांना बंदरात थोडाच वेळ मिळतो आणि कापड खरेदी करून त्याचे कपडे शिवून होईपर्यंत त्यांना वेळ नसतो. म्हणून १८०० पूर्वी काही वर्षे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरगावांत विक्रीसाठी तयार कपडे ठेवण्याची सोय करण्यास सुरुवात झाली. शिंपी गिऱ्हाइकांच्या मागण्या (ऑर्डरी) नोंदवीत, त्यांचे कापड बेतण्यासाठी रोजंदार ठेवीत व कापलेले तुकडे जोडण्यासाठी बाहेर पाठवीत. नंतर काही शिंप्यांनी मंदीच्या मोसमात मागणीशिवाय कपडे तयार करण्यास सुरुवात केली व दुकानात येणाऱ्या गिऱ्हाइकांस असे कपडे ते विकीत; पण या पद्धतीत सर्व कामे हातीच होत असत. मच्छिमारी करणाऱ्या विशेषतः व्हेल मासे पकडणाऱ्या बोटींवरील कोळ्यांसाठी पावसाळी कपडे १८०० च्या सुमारास बॉस्टन शहरात बनविण्यात येऊ लागले. पुरुषांचे कपडे बनविण्याचा धंदा १८२२ मध्ये सुरू झाला (पण नेकटाय १८६० पासून बनविण्यात येऊ लागले). कपडे उत्पादक कारखानदारी यातूनच उद्भवून तिने १८२८–३० च्या सुमारास चांगले मूळ धरले. याच सुमारास सुरू झालेला लोकरीचे कापड बनविण्याचा घरगुती धंदा व शिवणकामाचे यांत्रिकीकरण या दोन गोष्टींमुळे तयार कपड्यांच्या कारखानदारीला पुष्कळ चालना मिळाली आणि पुरुषांचे तयार कपडे बनविणे सर्रास सुरू झाले. हाताने पडणाऱ्या प्रती मिनिट ३० ते ४० टाक्यांच्या जागी शिवणयंत्रावर ९०० टाके पडू लागले. कपड्यांचा उठाव जलद होऊ लागल्याने यात भरच पडली. अमेरिकेतील यादवीच्या वेळी (१८६१–६५) सैन्याला गणवेष पुरविण्यासाठी ठेके देण्यात आले. त्या वेळी सरकारने गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर पुरुषांच्या कपड्यांच्या मापाचे प्रमाणीकरण करण्यात आले व या प्रमाणीकरणामुळे तयार कपड्यांच्या उद्योगाला खूपच मदत झाली. असे असले तरी युद्धकाळाच्या सुमारासही देशातील कपड्यांच्या एकंदर उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन शिवून घेतलेल्या कपड्यांचेच होते. तयार कपड्यांच्या धंद्याच्या प्रगतीचे पुढील महत्त्वाचे पाऊल यंत्रांच्या सुधारणेमुळे १८७० च्या सुमारास उचलले गेले. कापडाच्या कडा दुमडणारे, घडीला चुण्या घालणारे, कडा आत दुमडून शिवणारे, शिवण न दिसता टीप घालणारे, गुंड्या शिवणारे, काज करणारे, मिनिटाला ४,००० टाके घालणारे वगैरे प्रकारची यंत्रे बनविण्यात आली या सर्व सुधारणांमुळे १९१५ पर्यंत पुरुषांच्या कपड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या वीज वापरात त्याच्या अगोदरच्या २५ वर्षांपेक्षा ६–७ पट वाढ झाली. या सर्व प्रगतीबरोबर या धंद्यातील कामगारांचे कमी वेतन, कामाचे जास्त तास, कामाच्या जागेतील गलिच्छपणा वगैरे गोष्टी कामगार संघटना स्थापून त्यांच्या प्रयत्नांनी दूर केल्या गेल्या.
