| गाळाचे खडक |
| पान २ |
| पान ३ |
| पान ४ |
| पान ५ |
| पान ६ |
| पान ७ |
| पान ८ |
| पान ९ |
| पान १० |
गाळाचे खडक : भूपृष्ठाचे अनाच्छादन (झीज) घडवून आणणाऱ्या कारकांच्या रासायनिक व भौतिक क्रियांनी आधीच अस्तित्वात असलेल्या खडकांच्या अपघटनाने (रासायनिक दृष्ट्या घटक अलग झाल्याने ) किंवा विघटनाने (तुकडे झाल्याने) तयार झालेला चुरा म्हणजे गाळ सामान्य तापमानाच्या व दाबाच्या परिस्थितीत निक्षेपित होऊन (साचून) तयार झालेल्या खडकांना गाळाचे किंवा अवसादी खडक म्हणतात. हा चुरा मोठाले धोंडे, गोटे, दगड तसेच माती इ. भिन्न आकारमानांच्या घटकांचा असतो. सामान्यतः चुऱ्याचा बराचसा भाग पाण्यामध्ये अविद्राव्य (न विरघळणारा) असतो आणि वाहत्या पाण्याबरोबर तो निलंबनाच्या (लोंबकळत्या) स्वरूपात वाहून नेला जातो. सामान्य भाषेत गाळ ही संज्ञा पाण्यात किंवा इतर द्रवांत मिश्रित असलेल्या घन पदार्थांना उदा., पुराच्या गढूळ पाण्यातील दगड, माती किंवा रेती यांसारख्या पदार्थांना देण्यात येते; पण भूवैज्ञानिक वर्णनात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या पदार्थांचाही गाळ किंवा अवसाद या संज्ञेत समावेश केला जातो. गाळांचे थर एकावर एक असे पडत जाऊन व साचत जाऊन हे खडक तयार होत असल्यामुळे ते अनेक थरांचे बनलेले असतात. अशी स्तरांकित रचना किंवा स्तरण हा गाळाच्या खडकांचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे.
भूकवचाच्या तीन प्रकारच्या खडकांपैकी गाळाचे खडक हा एक प्रकार असून ⇨अग्निज खडक व ⇨ रूपांतरित खडक हे इतर दोन प्रकार होत. अग्निज खडक निर्मितीच्या काळापासून घन असतात, म्हणून त्यांना आद्य खडक असेही म्हणतात. उलट गाळाचे खडक हे आधीच असलेल्या तिन्ही प्रकारच्या खडकांच्या चुऱ्यापासून तयार झालेले असतात, म्हणून त्यांना कधीकधी द्वितीयक खडक असेही म्हणतात. पृथ्वीच्या भूवैज्ञानिक इतिहासाबद्दल गाळाचे खडक इतर प्रकारांच्या खडकांपेक्षा बरीच अधिक माहिती पुरवितात. पृथ्वीवर प्राणी व वनस्पती यांचा क्रमविकास (उत्क्रांती) कसा झाला, हे त्यांच्यातील जीवाश्मांवरून (जीवांच्या अवशेषांवरून) समजू शकते. कोळसा, नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) व खनिज तेल, लोह धातुके (कच्ची धातू), चुनखडक, निरनिराळी लवणे व इतर औद्योगिक व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे पदार्थ गाळाच्या खडकांतून मिळतात.
भूपृष्ठाची झीज : पृथ्वीच्या कवचाच्या खडकांवर वातावरणक्रियेचा म्हणजे वातावरण, ऊन, पाऊस इत्यादींचा परिणाम होऊन त्यांचे भौतिक विघटन व रासायनिक अपघटन होते व एकसंध खडकांचे तुकडे पडतात व त्यांचा चुरा होतो. भूपृष्ठावर किंवा उथळ जागी भूपृष्ठाची झीज घडवून अनाच्छादनाचे कार्य करणाऱ्या निरनिराळ्या कारकांच्या; उदा., नद्या, हिमनद्या, वारा इत्यादींच्या; क्रियांनी देखील खडकांचा चुरा तयार होतो. हा सर्व प्रकारांनी तयार होणारा चुरा सामान्य दाब व तापमानाच्या परिस्थितीत तयार होत असतो. पाण्यात विरघळू शकतील अशी काही खनिजे मूळच्या खडकांत असणे शक्य असते व अपघटनाच्या प्रक्रियेत मूळच्या काही अविद्राव्य खनिजांपासून पाण्यात विद्राव्य (विरघळणारे) असे पदार्थ निर्माण होतात. वरील प्रकारांनी तयार झालेले पदार्थ दीर्घकाळ मूळ जागीच पडून राहत नाहीत. वाहते पाणी, वारा इत्यादींमुळे ते कमी अधिक वेगाने मूळ जागेपासून दुसरीकडे वाहून नेले जातात. त्यांच्यातील पाण्यात अविद्राव्य असे पदार्थ जमिनीवरील दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात किंवा समुद्राच्या तळावर साचविले जातात. पाण्यातील विद्राव्य पदार्थ जमिनीत मुरणाऱ्या किंवा नद्यानाल्यांच्या पाण्याबरोबर निघून जातात व त्यांपैकी बरेचसे अखेरीस समुद्रात शिरतात. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत भौतिक किंवा रासायनिक फेरफार घडून येऊन पाण्यात विरघळलेले पदार्थ सरळ अवक्षेपित (साका होऊन खाली बसणे) होणे शक्य असते. तसेच प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जीवनक्रियांमुळेही ते अवक्षेपित होणे शक्य असते. वर उल्लेख केल्यासारख्या प्रक्रियांनी निक्षेपित चुऱ्याच्या किंवा अवक्षेपित झालेल्या पदार्थांच्या राशींपासून गाळाचे खडक तयार होतात.
गाळाचे खडक पृथ्वीच्या कवचाचा फक्त पाच टक्के भाग व्यापतात. असे असले तरी भूपृष्ठावर उघड्या पडलेल्या एकूण खडकांपैकी ७५ टक्के भाग त्यांचा बनलेला आहे. यावरून भूपृष्ठावरील सापेक्षतः पातळ जाडीच्या पट्ट्यात गाळाचे खडक पसरलेले आहेत, हे सहज दिसून येते. गाळाच्या खडकांची जाडी मात्र निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. अग्निज खडकांच्या पर्वतावर काही ठिकाणी ते आढळत नाहीत, उदा., जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात आढळणाऱ्या बेसाल्टावर गाळाचे खडक नाहीत. काही पर्वतांवर २ ते ५ मी. इतक्याच जाडीचे आहेत. उदा., अमेरिकेतील ओझार्क किंवा अॅडिराँडॅक पर्वत; तर कधीकधी ते हजारो मीटर जाडीचे असतात. उदा., (१) खंबायत द्रोणी सु. २,७०० मी., (२) कावेरी द्रोणी सु. ७,५०० मी., (३) अमेरिकेतील मिसिसिपी नदीचे खोरे १०,००० मी., (४) आसाममधील द्रोणी १५,००० मी.
खडकांवर वातावरणक्रिया होऊन तयार होणाऱ्या सुट्या पदार्थांचे पुढील वर्ग करता येतात : (१) मूळ खडकांचे लहान मोठे तुकडे, धोंडे, ठोकळे इत्यादी. यांच्यातील खनिजात फारसा किंवा मुळीच बदल झालेला नसतो. (२) मूळच्या खडकातील टिकाऊ व अपघटन न झालेल्या खनिजांचे सुटे झालेले स्फटिक, बारीक कण किंवा चकत्या : कॉर्ट्झ व शुभ्र अभ्रक ही खनिजे अतिशय टिकाऊ असतात. झिर्कॉन, रूटाइल, गार्नेट, तोरमल्ली, कायनाइट, मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, इल्मेनाइट, क्रोमाइट इत्यादींपैकी काही खनिजे खडकात अल्प किंवा अत्यल्प प्रमाणात असतात. तीही अतिशय टिकाऊ असतात. अशी खनिजे मूळच्या खडकात असली, तर त्यांचे अपघटित न झालेले मोठे स्फटिक किंवा कण वातावरणाच्या क्रियेने तयार झालेल्या चुऱ्यात आढळतात. अशा चुऱ्यात फेल्स्पारांचे कणही असणे शक्य असते, पण सामान्यतः ते बरेच अपघटित असतात. (३) मूळच्या खडकांतील खनिजांचे अपघटन होऊन तयार झालेले पदार्थ : खनिजांच्या अपघटनाने तयार होणाऱ्या पदार्थांपैकी काही जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारे) असणे शक्य असते. उदा., फेल्स्पारांच्या गटातील खनिजांत असणाऱ्या सोडीयम, पोटॅशियम किंवा कॅल्शियम यांच्यापासून जलविद्राव्य कार्बोनेटे तयार होतात. फेरोमॅग्नेशियमी सिलिकेटातील मॅग्नेशियम व लोह यांच्यापासूनही जलविद्राव्य कार्बोनेटे तयार होतात. परंतु ऑक्सिजनाच्या सानिध्यात विद्रावातील लोही कार्बोनेटाचे हेमॅटाइट किंवा मॅग्नेटाइट या खनिजांच्या स्वरूपात अवक्षेपण होते. सिलिकेटांच्या अपघटनातदेखील जलविद्राव्य सिलिका काही प्रमाणात तयार होते. अपघटनाने तयार होणाऱ्या अविद्राव्य पदार्थांपैकी मुख्य म्हणजे सजल अॅल्युमिनियम सिलिकेट असणारी मृद्-खनिजे; सर्पेंटाइन-संगजिरे यांच्या गटातील सजल मॅग्नेशियम सिलिकेटे आणि क्लोराइट, हायड्रोमायका, झिओलाइट व एपिडोट या गटातील खनिजे ही होत. लोह व अॅल्युमिनियम यांची विविध हायड्रॉक्साइडे व कलिल (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असणाऱ्या द्रव मिश्रणाच्या स्वरूपातील) सिलिका हीसुद्धा वरील खनिजांच्या बरोबर थोड्याफार प्रमाणात असणे शक्य असते. अपघटनाने तयार झालेले हे पदार्थ सामान्यतः पिठासारखे सूक्ष्मकणी असतात.
