| धरणे व बंधारे |
| पान २ |
| पान ३ |
| पान ४ |
| पान ५ |
| पान ६ |
| पान ७ |
| पान ८ |
| पान ९ |
| पान १० |
| पान ११ |
धरणे व बंधारे : नदीच्या अथवा कुठल्याही जलप्रवाहाच्या पात्रात पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करण्यासाठी बांधण्यात येणारी भिंत म्हणजे धरण होय. धरण हे योग्य स्थळी जलप्रवाहाच्या खोऱ्याच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत बांधलेली एक विस्तृत भिंतच असते. पुष्कळ वेळा धरणावरून वाहतूक करण्यासाठी योग्य रुंदीचा रस्ताही ठेवतात. ही भिंत जर कमी उंचीची असेल (आणि तीवर पाण्याचा साठा करण्याकरिता लोखंडी दारे बसविलेली असतील), तर त्याला बंधारा म्हणतात. अनेक वेळा लहान मोठ्या नाल्यामधून वाहत्या पाण्याची पातळी उंचावणे आणि ते वळविणे यांकरिता जलप्रवाहाच्या पात्रात जी लहान भिंत बांधतात तिला लघुबंधारा म्हणतात. लघुबंधाऱ्याला लोखंडी दारांची आवश्यकता नसते. तसेच यामुळे होणारा पाण्याचा साठा अतिशय कमी प्रमाणात असतो. पावसाळ्यात पूराच्या वेळी संपूर्ण बंधाऱ्यावरून तसेच लघुबंधाऱ्यावरूनही पाणी वाहते. या उलट धरणाच्या बांधणीमध्ये धरणाच्या एकूण लांबीपैकी फक्त काही विवक्षित लांबीवरूनच पाणी वाहू देण्याची मुभा असते धरणाचा बाकीचा भाग हा जलाशयाच्या पाण्याच्या कमाल पातळीच्यावर काही उंचीपर्यंत बांधलेला असतो.
इतिहास : धरणांचा इतिहास फार पुरातन आहे. प्राचीन काळी इजिप्त, मेसोपोटेमिया, चीन आणि भारत या देशात कोरड्या ऋतूंत शेतीसाठी व माणसांच्या उपयोगासाठी आणि पुरांपासून संरक्षण करण्याकरिता अनेक धरणे बांधली गेली होती.
नाईल नदीवरील कोशेश येथे इ.स. पू. २९०० च्या सुमारास बांधलेले १५ मी. उंचीचे धरण हे सर्वांत प्राचीन धरण मानण्यात येते. हे धरण मीनीझ या राजाच्या मेंफिस येथील राजधानीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधले होते. ईजिप्तमधील इ.स. पू. २७०० च्या सुमारास नाईल नदीवर बांधलेले साद-एल्-काफारा नावाचे दगडी धरणही जगातील एक जुने म्हणून मानण्यात येते व या धरणाचे अवशेष अद्यापही पहावयास मिळतात. ते धरण कैरोपासून सु. ३० किमी. अंतरावर होते आणि त्याची लांबी १०६ मी. व उंची १५ मी. होती. हे धरण बांधल्यानंतर थोड्याच काळात सांडव्याच्या अभावी पुरामुळे पडले व त्यानंतर अनेक शतके ईजिप्तमधील लोकांनी दगडाची धरणे बांधली नाहीत. अद्यापही उपयोगात असलेले सर्वांत जुने धरण सिरियातील ओराँटीझ नदीवरील असून ते ६मी. उंचीचे व दगडी भरावाचे आहे.
इ.स. पू. १००० पर्यंत ॲसिरियन लोकांनी शेतीसाठी पाणी वळविण्याकरिता टायग्रिस नदीवर समारा आणि इतर ठिकाणी धरणे बांधली. यांपैकी काही दगडाची होता. इ.स. पू. ७०० च्या सुमारास ॲसिरियन लोकांनी निनेव्ह या शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी टायग्रिस नदीवर एक धरण बांधले.
चीन मध्ये इ.स.पू. २२८० च्या सुमारास सम्राट याव यांनी लोकांना व जमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणे आणि कालवे बांधले. इ. स. पू. ३०० च्या सुमारास मिन नदीवर बांधलेल्या धरणांच्या मालिकेद्वारे विस्तृत प्रदेशाला पाणी पुरविले जात होते.
भारतात व श्रीलंकेत प्राचीन काळी लोकांना व जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक मातीची धरणे बांधण्यात आलेली होती. उत्तर भारतात नद्यांना बारमाही पाणी असल्याने त्यांवर कमी उंचीची व फारच थोडा साठा करणारी धरणे बांधून पुराचे पाणी शेतात घेतले जाई व त्या पाण्यावर चांगली पिके काढण्यात येत. द. भारतात अशा बारमाही पाणी असलेल्या नद्या फारशा नसल्याने पाणी साठविण्यासाठी मातीची व क्वचित दगडी बांधकामाची छोटी धरणे बांधली गेली. इ.स. ५०० ते १८०० या काळात द. भारतात पल्लव आणि इतर राजांनी अनेक मातीची धरणे बांधल्याचे उल्लेख आढळतात. इ.स. दुसऱ्या शतकात करिकाल या चोल राजांनी बांधलेल्या कावेरी नदीवरील महान अनईकट्टु (ग्रँड ॲनिकट) या दगडी बंधाऱ्यापासून आजही तंजावर जिल्हातील हजारो हेक्टर शेतीसाठी पाणी पुरविले जात आहे. इ.स.पू. चौथ्या शतकात श्रीलंकेतील अनुराधपूर या प्राचीन शहराच्या आसपासच्या प्रदेशाला शेतीसाठी पावसाळ्यातील पाणी साठविण्याकरिता कालाबालाला नावाचा जलाशय (तलाव) बांधण्यात आलेला होता. या जलाशयाकरिता बांधलेल्या मातीच्या धरणाची उंची सर्वांत खोल ठिकाणी २४ मी. आणि लांबी जवळजवळ ६ किमी होती. या जलाशयाचा परिघ सु. ६० किमी. होता. श्रीलंकेत बांधलेले असे काही जलाशय अद्यापही उपयोगात आहेत. भारतामध्ये मातीच्या धरणाच्या भिंतीच्या उतरत्या भागावर तासलेले दगड बसविण्याची पद्धत प्रचारात होती. या पद्धतीने इ.स. १०११ ते १०३७ या कालखंडात बांधलेल्या तमिळनाडूतील वीरनाम धरणाची लांबी सु. १६ किमी. होती. भारतातील पहिले मोठे दगडी धरण म्हणजे पुण्याजवळील खडकवासला येथे १८७९ साली बांधलेले धरण होय.
साबा (आताचे येमेन) येथील राज्यात इ.स.पू. ७५० च्या सुमारास प्राचीन काळातील एक मोठे म्हणून मानण्यात येणारे धरण बांधण्यात आले. हे धरण कोणत्याही संयोजकाशिवाय जोडलेल्या दगडाचे बांधलेले होते. हे धरण इ.स. सहाव्या शतकात कोसळले. तथापि त्याच्या भिंतीचे सु. १५ मी. उंचीचे काही भाग अद्यापही उभे आहेत.
रोमन लोकांनी इटली, उ. आफ्रिका व इतरत्र अनेक मोठी दगडी धरणे बांधली आणि त्यांतून शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या काही ⇨जलवाहिन्या अद्यापही चांगल्या अवस्थेत आहेत. सध्याच्या लिबियामध्ये रोमन लोकांनी शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी कमी उंचीच्या धरणांचा एक व्यूह तयार केलेला होता. दक्षिण स्पेनमध्ये रोमन लोकांनी बांधलेले सुप्रसिद्ध कोरनाल्डो धरण २३ मी. उंच व १८३ मी. लांब होते.
इराणमध्ये चौदाव्या शतकाच्या प्रारंभी केबर नावाचे एक आद्य कमानी धरण बांधण्यात आले. त्याची उंची २६ मी. व जाडी ५ मी. पेक्षा कमी होती. त्याच्या मधल्या वक्र भागाची लांबी व त्रिज्या ३८ मी. होती आणि हा भाग दोन सरळ टेक्यांवर आधारलेला होता.
रोमन साम्राज्य लयाला गेल्यानंतर मोठी धरणे बांधण्याची कला सोळ्याव्या शतकापर्यंत फारशी प्रगत झाली नाही. या शतकात स्पॅनिश स्थापत्यविज्ञांनी सिंचाईसाठी मोठी धरणे बांधली. १५८९ मध्ये त्यांनी बांधलेल्या टिबी धरणाची उंची ४६ मी. होती आणि एकोणिसाव्या शतकपर्यंत हा उच्चांकच राहिला होता.
