| धर्मप्रेषित, धर्मयुद्धे |
| पान २ |
| पान ३ |
धर्मप्रेषित : पहा प्रेषित.
धर्मयुद्धे : मध्ययुगीन यूरोपमध्ये मुस्लिम सत्तेच्या ताब्यात गेलेली ख्रिस्ती लोकांची ‘पवित्र भूमी’ (पॅलेस्टाईनमधील जेरूसलेम, बेथलिएम इ. शहरे) परत मिळविण्यासाठी वेळोवेळी केलेल्या लष्करी प्रयत्नांना (इ. स. १०९६ ते १२९१) सर्वसाधारणपणे ‘क्रूसेड’ ही संज्ञा देण्यात येते. या मुक्तिसंग्रामात लढणारे सैनिक आपल्या छातीवर क्रूसचे चिन्ह वापरीत म्हणून त्यांस क्रूसेड हे नाव पडले असावे. पश्चिम यूरोपमध्ये त्या काळात पाखंडी, धर्मद्रोही व पोपचे शत्रू यांच्या विरुद्धही धर्माच्या नावाखाली काही मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. (उदा., दक्षिण फ्रान्समधील पाखंडी लोकांविरुद्धची मोहीम, इ. स. १२१०) त्यांचाही अंतर्भाव ‘धर्मयुद्धात केला जातो. तेव्हा कोणत्याही पवित्र वाटणाऱ्या कार्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी हा शब्द इंग्रजी भाषेत रूढ झाला. त्याला मराठीत धर्मयुद्ध हा प्रतिशब्द वापरण्यात येतो. धर्म व नीती यांनुसार चालविलेले युद्ध हा त्याचा अर्थ येथे अभिप्रेत नाही. परधर्माच्या लोकांचे धर्मांतर करणे हासुद्धा त्याचा उद्देश नव्हता. त्या अर्थाने इस्लामी ‘जिहाद’च्या कल्पनेहून क्रूसेडची कल्पना थोडी वेगळी आहे. धर्माच्या संरक्षणासाठी त्याच्या शत्रूंचा निःपात करणे ही धर्मयुद्धाची कल्पना त्याकाळाच्या यूरोपीय जनमानसात होती असे दिसते. त्यास अनुसरून त्या काळात यूरोपमध्ये ज्यू धर्मीयांचे अनेक ठिकाणी शिरकाण करण्यात आले. स्पेन व सिसिली हे यूरोपचे भाग मुस्लिम राजकर्त्यांकडून परत जिंकून घेण्याच्या प्रयत्नांनाही पोपने धर्मयुद्धांचा दर्जा दिला होता; परंतु प्रामुख्याने पॅलेस्टाईन जिंकून तेथे ख्रिस्ती लोकांची सत्ता स्थापन करण्यासाठी ही चळवळ उभारण्यात आली.
धर्मयुद्धाच्या कल्पनेने अनेकांना विविध कारणांमुळे आकर्षित केले होते आणि त्यांवर या सर्वांचा प्रभाव पडलेला दिसतो : (१) बाराव्या शतकात यूरोपमध्ये धार्मिकतेची एक लाट उसळली होती. त्यामुळे या चळवळीस सामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला आणि अनेक शिलेदार स्वेच्छेने या चळवळीत येऊन मिळाले. यांतील अनेक मोहिमा पोपच्या प्रेरणेने हाती घेण्यात आल्या. या धर्मयुद्धात लढणाऱ्या लोकांना पापक्षालनासंबंधी काही विशेष सवलती पोपने जाहीर केल्यामुळेही सामान्य लोक यांत सहभागी झाले असावेत. (२) या काळात यूरोपमध्ये सरंजामी व्यवस्था असल्यामुळे अंतर्गत यादवीस ऊत आला होता. या मूलतः युद्धप्रिय प्रवृत्तीस यूरोपबाहेर वाट काढून देऊन यूरोपमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी धर्मयुद्धाची कल्पना सोयीची होती. (३) सरंजामी व्यवस्थेत वडील मूलगा हाच वारस असल्यामुळे कनिष्ठ पुत्रांना आपले कर्तृत्व दाखविण्याची, मध्य आशियात स्वतःचे राज्य कमविण्याची संधी धर्मयुद्धाच्या रूपात दिसणे स्वाभाविक होते. अशा अनेक सरदारपुत्रांनी या धर्मयुद्धांचे नेतृत्व केल्याचे दिसते. (४) बायझंटिनच्या सम्राटांना धर्मयुद्धाच्या साहाय्याने आपली सत्ता सिरिया व आशिया मायनर येथे पुनःस्थापित करता येईल व आपल्या साम्राज्याचे तुर्कांपासून रक्षण करता येईल, असे वाटत होते. (५) इटलीतील व्हेनिस, जेनोआ यांसारख्या व्यापारी शहरांनी मध्य आशियात आपल्या बाजारपेठा स्थापन करण्यासाठी तसेच व्यापारी सवलती मिळविण्यासाठी धर्मयुद्धांस मदत केली. (६) धर्मयुद्धांस चालना देण्यामागे स्वतः पोपचा हेतूसुद्धा ग्रीक व लॅटिन या दोन्ही चर्च संघटना आपल्या नेतृत्वाखाली आणणे हाही एक होता. जर्मन सम्राटाबरोबर सतत चाललेल्या संघर्षात धर्मयुद्धामुळे आपणास लोकप्रियता मिळेल, असेही त्यास वाटले असावे. (७) अकराव्या शतकापर्यंत यूरोपमधील ख्रिस्ती जगास दक्षिणेकडून इस्लामी सत्तेने अर्धचंद्राकृती वेढा दिला होता. त्याचे एक टोक म्हणजे स्पेनमधील मूर लोकांचे राज्य, तर पूर्वेस दुसरे टोक म्हणजे सेल्जुक तुर्कांचे आशियातील राज्य होय. या विळख्यातून सुटण्यासाठी यूरोपची प्रतिक्रिया धर्मयुद्धांच्या रूपाने प्रकट झाली, असेही म्हणता येईल. साधारणपणे इ. स. १०९७ ते १२९१ या दरम्यान आठ धर्मयुद्धे झाली असे मानण्यात येते. खरे तर ही एक अखंड चाललेली चळवळ होती. प्रतिवर्षी अनेक (सशस्त्र) ‘यात्रेकरू’ जेरूसलेमला जात, काही काळ तेथे राहत आणि तेथील ख्रिस्ती राज्यांच्या संरक्षणास मदत करीत. परंतु या मालिकेतील काही प्रमुख जय किंवा पराजय यांना धरून झालेल्या प्रयत्नांना धर्मयुद्धांचे क्रम दिले आहेत एवढेच.
पहिले धर्मयुद्ध : अकराव्या शतकाच्या शेवटी बायझंटिन साम्राज्य दुर्बल झाले होते. पूर्वेकडील सेल्जुक तुर्कांचा राजा हा त्यास प्रमुख शत्रू निर्माण झाला होता. सरदार व लष्करी अधिकारी यांच्यातील स्पर्धेमुळे ते आतून पोखरले गेले होते. याची परिणती म्हणजे इ. स. १०७१ मध्ये सम्राट रोमेनस याचा तुर्की सुलतान आल्प आर्सलान याने मालाझगिर्ट येथे केलेला दारूण पराभव होय. त्यानंतरच्या सम्राट अलेक्सिअस याने आपल्या राज्याच्या रक्षणासाठी पोप दुसरा अर्बन याकडे मदतीची याचना केली. यापूर्वीही अनेकदा बायझंटिन सम्राटांनी पश्चिम यूरोपमधून भाडोत्री सैनिकांचे साहाय्य घेतले होते आणि कदाचित आताही या स्वरूपातील मदतीचीच त्यांची अपेक्षा असवी. परंतु या निमित्ताने धर्मयुद्ध झाल्यास पॅलेस्टाईनची मुक्तता होऊन शिवाय ग्रीक धर्मपीठ आपल्या वर्चस्वाखाली येईल असे वाटल्यावरून पोपने क्लेरमाँ येथील धर्मपरिषदेत हा प्रश्न उपस्थित केला आणि धर्मयुद्धाची घोषणी केली. १५ ऑगस्ट १०९६ हा दिवस कूच करण्यासाठी मुक्रर झाला. याचे नेतृत्व लप्वीचा बिशप आदेमार याने करावे असे ठरले. पीटर नावाच्या साधूने जनतेत या धर्मयुद्धाचा प्रचार केला. त्याच्या प्रेरणेने अनेक लोक या ‘यात्रे’साठी जमा झाले. त्यात अनेक निःशस्त्र युद्धास अयोग्य असेही लोक होते. पापमुक्तीसाठी जेरूसलेमची यात्रा करण्याची कल्पना तशी जुनी होती. स्वसंरक्षणासाठी हे यात्रेकरू अनेकदा सशस्त्र असत. तेव्हा हे धर्मयुद्ध म्हणजे अशा यात्रेचाच एक प्रकार त्यांना वाटला असावा. अधिकृत सैन्य संघटित होण्यापूर्वीच या ‘यात्रेकरूं’नी पॅलेस्टाईनकडे कूच केली; परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच तुर्कांनी त्यांचा संहार केला (एप्रिल –ऑक्टोबर १०९६). याला जनतेचे धर्मयुद्ध असे नाव आहे.
संघटित धर्मयुद्धाची सुरुवात १०९७ मध्ये झाली. यूरोपमधील अनेक सरदारांनी यात भाग घेतला. लरेनचा ड्यूक गॉडफ्री व त्याचा भाऊ बॉल्डबिन हे हंगेरीमार्गे, तर तूलूझचा काउंट रेमाँ आणि बिशप आदेमार हे समुद्रकिनाऱ्याच्या मार्गाने कॉन्स्टँटिनोपलला पोहोचले. नॉर्मन सरदार बोएमाँ व त्याचा पुतण्या तँक्रेद हे समुद्रमार्गे तेथे येऊन पोहोचले. या तिन्ही गटांना स्वतःची राज्ये स्थापन करण्याची आकांक्षा होती . पहिल्या युद्धावर यांच्या सुप्त महत्त्वाकांक्षांची छाया पडल्याचे दिसते. सम्राट अलेक्सिअसला अशा ‘मदती’ची अपेक्षा नव्हती . यांपैकी नॉर्मन सरदार तर त्याचे जुने शत्रू होते. तेव्हा या सर्वांना आपणास एकनिष्ठ राहण्याची शपथ त्याने देवविली. पूर्वी साम्राज्याचा भाग असलेला प्रदेश जिंकल्यास तो त्यास परत करण्याचे वचनही त्यांच्याकडून घेतले आणि मग या धर्मसैनिकांना सशस्त्र बंदोबस्तात तुर्की सरहद्दीपर्यंत पोहोचविले.
